
शासकीय इंग्रजी आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मार्गदर्शन शिबिर उत्साहात

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : केवळ उच्च पद मिळविणे म्हणजे यश नव्हे, तर एक चांगला माणूस म्हणून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे हेच खऱ्या यशाचे लक्षण आहे. आदर्श अधिकारी होण्यासाठी सर्वप्रथम चांगला माणूस होणे आवश्यक आहे. उत्तम व्यक्तिमत्त्वासाठी नियोजनशीलता, शिस्तप्रियता, देशभक्ती, व्यसनमुक्ती आणि समाजाप्रती बांधिलकी ही मूल्ये अंगीकारली पाहिजेत, असे प्रतिपादन युवा व्याख्याते व स्तंभलेखक तुषार दुधबावरे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ गडचिरोली शहरातील सेमाना बायपास रोड परिसरातील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अधिपत्याखालील शासकीय इंग्रजी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून दुधबावरे यांनी विद्यार्थ्यांना करिअर, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांबाबत मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षांसोबतच व्यावसायिक शिक्षणालाही प्राधान्य द्या!
विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करून अभ्यासाची दिशा निश्चित करावी. नीट (NEET), जेईई (JEE) यांसारख्या स्पर्धा परीक्षांसोबतच डी.एड., बी.एड., कृषिशास्त्र, औषधशास्त्र तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातूनही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ मर्यादित पर्यायांचा विचार न करता आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार विविध क्षेत्रांचा शोध घ्यावा, असे आवाहन दुधबावरे यांनी केले.
जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून त्याला शिस्त, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि कठोर परिश्रमांची जोड असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून आव्हानांना सामोरे जावे, असेही त्यांनी सांगितले.
आत्मविश्वासाच्या बळावर आव्हानांवर मात करा!
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका वैष्णवी भुरले यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले. जीवनात यश मिळवायचे असेल, तर अभ्यासासोबत आत्मविश्वासाची जोड असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही आव्हानाला न घाबरता धैर्याने सामोरे जावे आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, असे त्यांनी नमूद केले.
विशेषतः विद्यार्थिनींनी शिक्षण अर्धवट सोडण्याचा विचार न करता उच्च शिक्षणाची कास धरावी. शिक्षण हे स्वावलंबनाचे प्रभावी साधन असून, त्याच्या बळावर मुलींनी स्वतःचे भविष्य घडवावे, असे प्रेरणादायी आवाहनही प्रा. भुरले यांनी केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका महल्ले होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वैष्णवी भुरले आणि सहाय्यक शिक्षक जी. टी. डोंगरवार उपस्थित होते. सहाय्यक शिक्षक जी. टी. डोंगरवार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला विद्यालयातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धा परीक्षांची तयारी, उच्च शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक

