
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कृष्णार फाटा–मिरगुळवांचा–धोबुर हा सुमारे ७ किलोमीटर लांबीचा माती-मुरूम रस्ता तातडीने मंजूर करून बांधकाम सुरू करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) केली आहे.

या मार्गावर योग्य रस्त्याची सुविधा नसल्याने माडिया आदिम जमातीच्या नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि निसरड्या पायवाटेमुळे पायी चालणेही कठीण होते. दुचाकी घसरण्याचा धोका असून, जंगलातील जंगली प्राण्यांच्या वावरामुळे रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक ठरतो.
रस्त्याअभावी रुग्ण आणि गरोदर महिलांचे हाल

रस्ता नसल्यामुळे आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी ग्रामस्थांना खाटेवरून किंवा बांबूच्या झोळीच्या साहाय्याने चिखलमय पायवाट पार करावी लागते. रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने उपचारास विलंब होण्याची शक्यता आहे. गरोदर महिलांनाही प्रसूतीच्या वेळी वेळेत रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतमालाची वाहतूक आणि बाजारपेठेशी संपर्क यावरही रस्त्याअभावी परिणाम होत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून कृष्णार फाटा ते मिरगुळवांचा सुमारे ४ किमी आणि मिरगुळवांचा ते धोबुर सुमारे ३ किमी या दोन्ही मार्गांचा एकत्रित विचार करून कृष्णार–मिरगुळवांचा–धोबुर रस्त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी CPI ने केली आहे.
सदर रस्त्याचा PM-JANMAN अभियानातील रस्ते जोडणी घटकांतर्गत संबंधित गावांची पात्रता तपासून समावेश करावा. तसेच आवश्यकतेनुसार महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी रस्ते विकास योजनेतून निधी उपलब्ध करून रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याला मंजुरी द्यावी. अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन संबंधित कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर CPI गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जक्कुलवार तसेच मिरगुळवांचा व धोबुर येथील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

