
न्युज जागर, नागपूर
दि. 24/08/2026 रोजी गोधनी रेल्वे, फागोजी लेआउट परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र येथे गंभीर स्वरूपाची गॅसगळतीची दुर्घटना घडली. विषारी वायूच्या प्रादुर्भावामुळे परिसरात भीती व घबराटीचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता.
सदर घटनेत अत्यंत प्रतिकूल व आपत्कालीन परिस्थितीत मानकापूर पोलीस स्टेशनच्या सहा.पोलीस निरीक्षक निशा खोब्रागडे या कर्तव्यावर असताना अतुलनीय धाडस, तत्परता, समयसूचकता तसेच कर्तव्यनिष्ठा प्रदर्शित करीत स्वतःच्या जीविताची पर्वा न करता , तात्काळ घटनास्थळी पोहोचवून बचाव व मदतकार्यात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे गॅसबाधित क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे तसेच बाधित नागरिकांना आवश्यक ती प्राथमिक मदत उपलब्ध करून देऊन त्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देणे शक्य झाले.


सहा.पोलीस निरीक्षक निशा खोब्रागडे यांच्या धाडसी, जबाबदार व सेवाभावी कार्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळून गंभीर अनर्थ होण्यापासून प्रतिबंध झाला.
सहा.पोलीस निरीक्षक निशा खोब्रागडे यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशंसापत्र देत भविष्यातही अशाच समर्पित वृत्तीने व कार्यक्षमतेने सेवा बजावून नागपूर शहर पोलीस दलाचा गौरव वृद्धिंगत करावा, ही अपेक्षा व्यक्त केली.

