
नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून सवलतीचा तिकीट व्यवहार NCMC कार्डच्या माध्यमातून करण्याच्या सूचनेमुळे ग्रामीण भागातील महिला प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वी महिलांना सवलतीचा प्रवास करण्यासाठी साध्या पद्धतीने तिकीट मिळत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला, विशेषतः दुर्गम गावांमधून तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिलांना कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेचा सामना करावा लागत नव्हता. मात्र आता NCMC कार्ड काढणे, ते सोबत ठेवणे आणि त्याचा वापर करणे ही अतिरिक्त जबाबदारी ग्रामीण महिलांवर आली आहे.

ग्रामीण भागात अनेक महिलांना डिजिटल व्यवहार, कार्ड रिचार्ज अथवा कार्डच्या तांत्रिक बाबींची माहिती नसते. बसस्थानकापासून दूर असलेल्या गावातील महिलांना कार्ड मिळविण्यासाठी पुन्हा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. कार्ड हरविल्यास किंवा तांत्रिक अडचण आल्यास सवलतीचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
‘महिलांना सवलत देण्याचा निर्णय स्वागतार्ह; मात्र सवलत मिळविण्याची प्रक्रिया सोपी असायला हवी,’ अशी भूमिका ग्रामीण महिला प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन NCMC कार्डची सक्ती करण्याऐवजी पूर्वीप्रमाणे सुलभ पद्धतीने सवलतीचा लाभ देण्याची किंवा कार्डसाठी गावपातळीवर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, गडचिरोली आगार व्यवस्थापकांच्या आदेशानुसार NCMC कार्डच्या माध्यमातून सवलतीचे तिकीट वितरित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाची ग्रामीण भागात प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना महिलांना कोणत्या अडचणी येतात, याकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

