
पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पेंढरी–गट्टा–जारावंडी तसेच आसपासच्या गावांमध्ये वाघाच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होणारे दर्शन, नागरिक व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील जनजीवन अक्षरशः धास्तावले आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांची भेट घेत वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली.

शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून शेतशिवारात जावे लागत आहे. जनावरांची देखभाल करणे, शेतीची कामे करणे आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. वाघाच्या दहशतीचा थेट परिणाम शेतीकामांवर तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे चित्र आहे.
परिसरातील अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. वनविभागाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करावे, नियमित गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि नागरिकांना आवश्यक सुरक्षा मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
दरम्यान, वनविभागाकडून तातडीने प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
“नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने आता केवळ पाहत बसण्याची भूमिका न घेता तातडीने ठोस पावले उचलली पाहिजेत. आणखी एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आजच प्रभावी बंदोबस्त करणे गरजेचे आहे,” अशी ठाम भूमिका महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मांडली.
पाच दिवसांचा अल्टिमेटम!
पेंढरी–गट्टा–जारावंडी परिसरातील धोकादायक वाघावर येत्या पाच दिवसांच्या आत प्रभावी नियंत्रण मिळवावे, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने वनविभागाला दिला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, नगरसेवक सतीश विधाते, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, संजय गावडे, विनोद लेनगुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला असताना वनविभाग आता कोणती भूमिका घेतो आणि वाघाच्या बंदोबस्तासाठी किती वेगाने कारवाई करतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

