
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी तालुक्यातील मच्छली (चेक चापलवाडा) येथे राष्ट्रसंत प.पू. शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत असताना समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी मच्छली (चेक चापलवाडा), ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता विशेष दारू व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रसंत प.पू. शेषराव महाराज यांच्या मार्गदर्शनातून आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दारूच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रेरणा देणे, तसेच व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व कौटुंबिक समस्यांबाबत जनजागृती करणे हा आहे.
“व्यसनमुक्त होणे हा मानवाचा पूर्णजन्म आहे” या संदेशातून व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, युवक, महिला तसेच व्यसनमुक्तीची इच्छा असलेल्या व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

