
मुख्य रस्ता, पाणीटंचाई, खराब रस्ते, खनिकर्म निधी आणि रेतीघाटाच्या प्रश्नांवर प्रशासनाला १ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याची मागणी
एटापल्ली : तालुक्यातील विविध प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एटापल्ली व्यापारी संघटनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था, तीव्र पाणीटंचाई, तालुक्यातील खराब रस्ते, खनिकर्म निधीचा स्थानिक विकासासाठी वापर, खनिज उत्खननामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान तसेच आलदंडी नदीपात्रातील रेती घाटाला नियमांनुसार मंजुरी यांसह विविध मागण्यांसाठी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी (SDM), एटापल्ली यांच्यामार्फत निवेदन सादर केले आहे.
प्रशासनाकडे यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही किंवा अधिकृत उत्तर मिळाले नसल्याचा दावा व्यापारी संघटनेने केला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मागण्यांवर ठोस उत्तर न मिळाल्यास २ सप्टेंबर रोजी एटापल्ली शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

दहा वर्षांपूर्वी मंजूर मुख्य रस्ता अद्याप प्रतीक्षेत
एटापल्ली शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुमारे दहा वर्षांपूर्वी मंजूर झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या मार्गावर नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी तसेच वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू करून निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
७० टक्के बोअरवेल कोरड्या? पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपायांची मागणी
यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक भागांमध्ये भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली. अंदाजे ७० टक्के बोअरवेलची पाणीपातळी घटल्याचा दावा व्यापारी संघटनेने केला आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाई टाळण्यासाठी नाला खोलीकरण, बंधारे, रिचार्ज पिट, जलसंधारणाची कामे आणि भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
खनिकर्म निधीचा स्थानिक विकासासाठी वापर करा
एटापल्ली तालुक्यातील खनिज संपत्तीमुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असताना त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. खनिकर्म निधीचा वापर प्रभावित व गरजू भागातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, जलसंधारण आणि इतर मूलभूत सुविधांसाठी पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गावागावांतील रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी
तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे प्रमुख तसेच अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांचे सर्वेक्षण करून प्राधान्यक्रम ठरवावा आणि आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती व नवीन बांधकामाची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
आलदंडी नदीवरील रेती घाटाला नियमांनुसार मंजुरी
आलदंडी नदी परिसरातील रेती घाटाला शासनाच्या नियमांचे पालन करून मंजुरी देण्यात यावी, अशीही मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. रेती उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, याची दक्षता घेत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रेतीघाट मंजुरीबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
अवजड वाहनांवर तात्पुरते निर्बंध घालण्याची मागणी
एटापल्ली शहरातील मुख्य रस्ता खराब असतानाही या मार्गावर दुचाकी, चारचाकी, स्कूल बस, महामंडळाच्या बसेस तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याची उपलब्ध जागा अपुरी असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अवजड ट्रक वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, व्यापारी संघटनेने २४ जुलै २०२६ रोजी तहसीलदारांना आणि १५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना याच विषयांवर निवेदने दिल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप अपेक्षित कार्यवाही न झाल्याने संघटनेने आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
१ सप्टेंबरपर्यंत प्रशासनाकडून मागण्यांबाबत ठोस उत्तर न मिळाल्यास २ सप्टेंबर रोजी एटापल्लीची संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन आता या प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे व्यापारी, नागरिक आणि तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

