
जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा; जादा दराने विक्री व अनधिकृत ‘लिंकिंग’विरोधात कृषी विभागाचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. ३१ : शेतकऱ्यांना खत खरेदी करताना इतर निविष्ठांची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कडक भूमिका घेतली आहे. खतांसोबत गरज नसलेल्या इतर निविष्ठांची खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे.

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी याबाबत खुलासा करताना जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाकडून तालुका व जिल्हास्तरावर नियमित देखरेख, तपासणी आणि सनियंत्रण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आवंटनापेक्षा तब्बल ९०० मेट्रिक टन अधिक युरिया
जिल्ह्यासाठी युरियाचे २१ हजार ५०० मेट्रिक टन आवंटन करण्यात आले असताना आतापर्यंत २२ हजार ४०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला आहे. म्हणजेच आवंटनापेक्षा तब्बल ९०० मेट्रिक टन अधिक युरिया जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे युरियाची टंचाई असल्याचे कारण देत शेतकऱ्यांवर इतर निविष्ठा घेण्याची सक्ती करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
‘लिंकिंग’ केले तर चौकशी, दोषींवर गुन्हेगारी कारवाईचा बडगा
खत कंपन्या, घाऊक विक्रेते किंवा कृषी सेवा केंद्र चालकांकडून खतांसोबत इतर निविष्ठांची अनधिकृतपणे जोडणी केली जात असल्याचे आढळल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. दोष सिद्ध झाल्यास खत नियंत्रण आदेश, १९८५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागाने दिला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या अध्यक्षतेखाली खत पुरवठ्याचा नियमित आढावा घेतला जात असून, तालुकानिहाय नियोजनानुसार उपलब्धतेच्या आधारे खतांचा पुरवठा केला जात आहे. खत कंपन्यांनाही मंजूर नियोजनानुसार पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जादा दराने विक्री करणाऱ्यांवरही नजर
खतांचे अनधिकृत लिंकिंग आणि जादा दराने विक्री रोखण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. सर्व तालुक्यांमध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले असून कृषी सेवा केंद्रांची नियमित तपासणी केली जात आहे.
शेतकऱ्यांना गरज नसलेली खते किंवा अन्य निविष्ठा घेण्यास कोणी भाग पाडत असल्यास किंवा निर्धारित दरापेक्षा अधिक दराने खत विकले जात असल्यास तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणारे लिंकिंग अथवा जादा दराची विक्री कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश कृषी विभागाने दिल्याने खत विक्रेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

