
परसलगोंदी नियतक्षेत्रात गस्तीदरम्यान कारवाई; दोन ते तीन दिवसांपूर्वीही एक ट्रॅक्टर पकडला

एटापल्ली : वनक्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी एटापल्ली वन विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी निलिमा के. खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या गस्ती दरम्यान परसलगोंदी नियतक्षेत्रात अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. वन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी विभागाने गस्त आणि कारवाई तीव्र केली आहे.
वन विभागाच्या पथकाकडून नियमित गस्त घातली जात असताना परसलगोंदी नियतक्षेत्रात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यानंतर पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित तीन ट्रॅक्टर जप्त केले. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी एन. के. खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक डी. एस. कायते, बी. डी. नागोसे, के. डी. मडावी, आर. के. देशमुख, ए. एम. कन्नाके, एस. एल. तोराम, ओमसाई आत्राम, आर. के. नैताम आणि पी. बी. सोयाम यांनी सहभाग घेतला.

विशेष म्हणजे, दोन ते तीन दिवसांपूर्वीही वन विभागाच्या गस्ती दरम्यान अवैध रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडण्यात आला होता. त्यानंतर अल्पावधीतच पुन्हा तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याने वन विभाग अवैध वाहतुकीविरोधात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. वारंवार होणाऱ्या अशा कारवायांमुळे नियमांचे उल्लंघन करून रेती वाहतूक करणाऱ्यांवर नियंत्रण येण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वनक्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे आणि अवैध उत्खनन तसेच वाहतुकीला आळा घालणे, हे वन विभागासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर विभागाकडून नियमित गस्त घालण्यात येत असून, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
वन विभागाकडून यापुढेही अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वनक्षेत्रातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी अशा मोहिमांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

