
पंचशिल वाळके द्वारा
खडसंगी/चंद्रपूर
ग्रामपंचायत खडसंगी येथे ग्रामस्थांनी विविध विकासकामे, प्रलंबित मागण्या आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी केली आहे. मात्र, मागणी करूनही विशेष ग्रामसभा घेण्याबाबत अद्याप ठोस निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी करण्यात आल्यानंतरही ग्रामपंचायतीकडून याबाबत स्पष्ट भूमिका का घेतली जात नाही? विशेष ग्रामसभा घेण्यास अडथळा नेमका कुठे आहे? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असेल, तर निर्णय घेण्यास विलंब का होत आहे? सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांची भूमिका काय आहे? तसेच ग्रामपंचायतीकडून निर्णय होत नसेल तर संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत हस्तक्षेप का केलेला नाही? ग्रामपंचायत स्तरावर होत असलेल्या विलंबाला वरिष्ठ प्रशासनाची मूक संमती किंवा पाठराखण आहे का? असा संतप्त सवाल आता गावकरी करू लागले आहे.
ग्रामसभा ही जनतेचा अधिकार की केवळ कागदोपत्री प्रक्रिया?
ग्रामसभेत गावाच्या विकासाशी संबंधित प्रश्न मांडण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची संधी ग्रामस्थांना मिळते. त्यामुळे विशेष ग्रामसभा घेण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यामागचे कारण काय, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “मागण्या ऐकायच्या नसतील तर ग्रामसभा कशासाठी? आणि ग्रामसभा घ्यायची नसेल तर लोकशाहीचा अर्थ काय?”
प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी
खडसंगी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेण्यास नकार दिला असल्यास त्याचे लेखी कारण ग्रामस्थांना द्यावे, अशी मागणी होत आहे. तसेच ग्रामसभा घेण्यास कोणत्या स्तरावरून अडथळा निर्माण झाला आहे, याची प्रशासनाने चौकशी करावी.
सरपंच, सचिव की वरिष्ठ अधिकारी — विशेष ग्रामसभा रखडण्यास जबाबदार कोण?
या प्रश्नाचे उत्तर आता ग्रामस्थांना हवे आहे. केवळ आश्वासन न देता प्रशासनाने निर्णय, कारण आणि जबाबदारी स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
“ग्रामसभा रोखली जात असेल तर पाठराखण कोणाची?”
हा प्रश्न सध्या खडसंगीच्या ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे

