
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली/देसाईगंज : देशाच्या स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्यदिन देसाईगंज येथील क्रीडा संकुलात देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य ध्वजारोहण सोहळ्यास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आमदार रामदासजी मसराम यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संकल्प केला. राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी क्रीडा संकुल दुमदुमून गेले.

स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, एकता व बंधुभाव कायम राखावा आणि राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
देसाईगंज शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने ध्वजारोहण सोहळ्याला विशेष दिमाख प्राप्त झाला.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्याचा अभिमान, राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकतेचा संकल्प आणि देशसेवेची नवी प्रेरणा—अशा उत्साहात देसाईगंजमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

