
५ हजारांहून अधिक विद्यार्थी, महिला, शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली : जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे संरक्षण, शेतकऱ्यांचे हक्क तसेच रोजगार, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आणि इतर मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद अभियानाचा स्वातंत्र्य दिनी, १५ ऑगस्ट रोजी गडचिरोली शहरात भव्य मानवी साखळीने समारोप करण्यात आला. या मानवी साखळीत जिल्ह्यातील ५ हजारांहून अधिक शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत एकजुटीचा संदेश दिला.

९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या लोकसंवाद अभियानाचा उद्देश स्वातंत्र्याच्या वारशाचे स्मरण करत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर विचारमंथन करणे, जनतेच्या समस्या जाणून घेणे आणि भविष्यातील संघर्षाची दिशा निश्चित करणे हा होता. अभियानाच्या समारोपाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सुपीक शेतजमिनी वाचविण्याची आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढण्याची भूमिका स्पष्ट केली.
गावागावात लढा उभारणार
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे संयोजक महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले, “‘चरखे के पास चर्चा’ या कार्यक्रमाचा समारोप झाला असला तरी शेतकऱ्यांच्या हक्कांची लढाई संपलेली नाही. जिल्ह्यातील सुपीक शेतजमीन आणि शेतकरी वाचविण्यासाठी आता पुढची लढाई गावागावात लढली जाणार आहे. या लढ्यात महिला भगिनींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी पुढाकार घ्यावा.”
ते पुढे म्हणाले की, आपल्या हक्कांच्या लढ्यात समाजात फूट पाडण्याचा किंवा मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीप्रमाणे समाजात दुही निर्माण करणाऱ्या प्रयत्नांना बळी न पडता शेतकरी, महिला, युवक आणि नागरिकांनी आपली एकजूट कायम ठेवावी. आपल्या हक्कांसाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विविध प्रश्नांवर लोकसंवाद
जागतिक आदिवासी दिनापासून क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन या कालावधीत झालेल्या ‘चरखे के पास चर्चा’ अभियानात विविध राजकीय, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत जिल्ह्यातील प्रश्नांवर आपली मते मांडली. विशेषतः सुपीक शेतजमिनींचे संरक्षण, शेतकऱ्यांचे हक्क, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा, शिक्षण, रस्ते व वाहतूक व्यवस्था तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यात आली.
या अभियानातून जनतेने मांडलेल्या प्रश्नांचा पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी गावागावात लोकसंवाद वाढवून व्यापक जनआंदोलन उभारण्याची भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
समारोपीय कार्यक्रमास महेंद्र ब्राह्मणवाडे, डॉ. अनंता कुंभारे, दिवाकर निसार, कुसुमताई आलाम, अनिल कोठारे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, नगरसेविका मनीषा खेवले, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, नेताजी गावतुरे, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, अब्दुल पंजवाणी, सुनील चडगुलवार, उत्तम ठाकरे, विजय लाड, सुभाष कोठारे, रोडे महाराज, तात्याजी चिचघरे, विजय शेंडे, जावेद खान, निकेश कामीडवार, राजाराम ठाकरे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, श्रीनिवास ताडपल्लीवार, डॉ. शीतल ठवरे, रीताताई गोवर्धन, मिनल चिमूरकर, उईके ताई, ढीवरू मेश्राम, देवानंद कुमरे, विकास जेंगठे यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ५ हजारांहून अधिक शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मानवी साखळीत सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखविली. त्यामुळे गडचिरोली शहरात नागरिकांच्या सहभागाने लोकशक्तीचे प्रभावी दर्शन घडले.
जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा सुरूच राहणार
‘चरखे के पास चर्चा’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेने मांडलेल्या विविध प्रश्नांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असून, शेतकरी व नागरिकांच्या हक्कांसाठी भविष्यातही लोकसंवाद आणि जनआंदोलनाची भूमिका कायम ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भव्य मानवी साखळीने ‘एकजूट, हक्क आणि संघर्ष’ यांचा संदेश देत ‘चरखे के पास चर्चा’ अभियानाचा जोशपूर्ण समारोप झाला.

