
नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबरला दाखल एका गुन्ह्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या कुठलाही संबंध नसताना व रिपोर्टिंगच्या कामासाठी शहराबाहेर असतांना देखील विजयकुमार खवसे या पत्रकारावर खोट्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करून गंभीर कलमे लावण्यात आली आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व एफआयआरमधून नाव वगळण्याच्या कार्यवाहीसाठी वेबचॅनलचे संपादक विजयकुमार खवसे यांनी शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निवेदन दिले आहे.
दाखल झालेल्या एफ आय आर नुसार क्रमांक तीनचा आरोपी म्हणून नाव नमूद असून या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे विजय कुमार खेवसे यांनी स्पष्ट केले . कथित घटना १५ मे २०२५ ची आहे. दुपारी तीन ते सायंकाळी चार वाजतादरम्यान ही घटना घडल्याचे नमूद आहे. मात्र त्यावेळी आपण नागपूरमध्ये उपस्थित नव्हतो. पत्रकारितेच्या कामानिमित्त राज्याबाहेर प्रवासात असल्याचा दावा खवसे यांनी केला असून तशा आशयाचे पुरावे त्यांनी निवेदनात जोडले आहे. १४ मे रोजी बोधगया येथून प्रयागराजकडे रेल्वेने प्रवास केला. त्यानंतर रात्री प्रवास करून सकाळी कटनी येथे उतरून तेथून पुढे प्रवास करीत १५ मे रोजी सायंकाळी सहा ते सात वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रवासासंदर्भातील डिजिटल पुरावे म्हणून थेट रेल्वेतील व्हिडीओ व स्क्रीनशॉट सादर केले आहेत. दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारावर नाव हेतुपुरस्सर या प्रकरणात जोडण्यात आलेअसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भविष्यात अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवू नये. याविरोधात सर्व न्यायिय यंत्रणांकडे आपण दाद मागणार असून विनाकारण गोवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी पाऊल उचलण्याबाबत म्हटले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आपले नाव वगळावे, अशी मागणी पोलीस आयुक्त व गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
वेबचॅनलचे संपादक विजयकुमार खवसे यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता मी बौद्ध समाजाचा आहे , आंबेडकरी विचारांचे आंदोलन असो, सामाजिक कार्यक्रम असो किंवा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांची मुलाखत असो माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमी प्रयत्न केला आहे. आणि नेमकी हीच गोस्ट काही लोकांना खटकत आहे म्हणून मुद्दाम टार्गेट करण्यात येत आहे व पत्रकार या नात्याने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारणे आणि वंचितांच्या हक्कांसाठी बोलणे हे माझे कर्तव्य असून अशापद्धतीने माझा आवाज दाबता येणार नाही…! असेही ते बोलले.


