
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’; कोरचीत ‘अंगणवाडी उत्सव’
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २९ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ भाजपा महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने कोरची तालुक्यात ‘अंगणवाडी उत्सव अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमादरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरची येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक १ ते ४ मधील तसेच तालुक्यातील भीमपूर, सोहले टोला, सोहले आणि झेंडेपार येथील अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिताताई पिपरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस बालकांच्या संगोपनासोबतच त्यांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोषण, आरोग्य आणि बालविकासाच्या सेवा पोहोचविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘अंगणवाडी उत्सव’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वाटपही करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चा जिल्हा महामंत्री लता पुन्घाटे, महामंत्री कु. प्रिती शंभरकर, जिल्हा सचिव रुपाली कावळे, कोरची तालुका अध्यक्ष शिला सोनकतरी, गडचिरोली शहर कोषाध्यक्ष रश्मी बानणारे तसेच कु. सगुणा काटंगे यांची उपस्थिती होती.
‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा सन्मान करून त्यांच्या सेवाभावी योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

