
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी
मसेली आश्रमशाळेतील प्रकार; सकाळी हजेरीच्या वेळी प्रशासनाला लागली माहिती — सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
कोरची :

कोरचीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेली येथील शासकीय आश्रमशाळेतून इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी मध्यरात्री सुमारे १२ वाजता शाळेच्या आवारातून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही विद्यार्थिनी शाळेत नसल्याची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता हजेरी घेताना अधीक्षक व मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माहिती मिळताच मुख्याध्यापक व अधीक्षक यांनी तत्काळ कोरची पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक दीपक डोम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत दोन्ही विद्यार्थिनींचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थिनी रात्री मसेली येथून पायी कोरचीपर्यंत आल्या आणि त्यानंतर कुरखेडा येथे गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना कुरखेडा येथून ताब्यात घेत कोरची पोलीस ठाण्यात आणले.
रात्री बारा ते सकाळी आठ; प्रशासनाला माहितीच नाही?
या घटनेतील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे विद्यार्थिनी मध्यरात्री आश्रमशाळेच्या परिसरातून बाहेर पडल्याचे सांगितले जात असताना सकाळी आठ वाजेपर्यंत शाळा प्रशासनाला त्याची माहिती झाली नाही. रात्री विद्यार्थिनींच्या उपस्थितीची पाहणी झाली होती का? मुली शाळेच्या आवाराबाहेर कशा गेल्या? प्रवेशद्वारावर देखरेख कोणाची होती? चौकीदाराची रात्रीची ड्युटी होती का? या प्रश्नांची उत्तरे आता महत्त्वाची ठरणार आहेत.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अधीक्षक, मुख्याध्यापक, अधीक्षिका तसेच चौकीदार यांच्यावर असताना या घटनेत नेमके कुठे दुर्लक्ष झाले, याची चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती
आश्रमशाळेतील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असतानाही सध्या हे कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर येत आहे. जर कॅमेरे कार्यरत असतील तर विद्यार्थिनी मध्यरात्री शाळेच्या आवारातून कधी व कोणत्या मार्गाने बाहेर पडल्या, याचा तपास करणे शक्य झाले असते. त्यामुळे सीसीटीव्ही व्यवस्था बंद का आहे, ती किती दिवसांपासून बंद आहे आणि तिच्या देखभालीची जबाबदारी कोणाची, याचीही चौकशी आवश्यक आहे.
जपतलाई घटनेनंतरही सुरक्षेचा प्रश्न कायम
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मसेली आश्रमशाळेतील हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या उपाययोजना प्रत्यक्षात किती प्रभावी आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवास, आरोग्य आणि सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, मध्यरात्री दोन विद्यार्थिनी शाळेच्या आवारातून बाहेर पडतात आणि तब्बल आठ तासांनंतर त्याची माहिती प्रशासनाला होते, ही बाब गांभीर्याने तपासण्याची गरज आहे.
या घटनेमुळे आश्रमशाळांमधील रात्रीची सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती तपासणी, प्रवेशद्वारावरील देखरेख आणि सीसीटीव्ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित विभागाने घटनेची चौकशी करून सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची मागणी होत आहे.

