
१९५८ पासून प्रलंबित शेतीपट्ट्यांचा प्रश्न; आमदार डॉ. मिलिंद नरोटे शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : चामोर्शी तालुक्यातील रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांना १९५८ पासून शेतीच्या पट्ट्यांपासून वंचित राहावे लागत असल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे पट्टे तातडीने देण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मंजेगाव येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंजेगाव येथे दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे हे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतीपट्टे तसेच महसूल व भूमी अभिलेखाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. संबंधित महसूल व भूमी अभिलेख विभागाचे प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रशासकीय पातळीवर दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही, हळदवाहीटोला, पेटतळा आणि भाडभीडी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी केले आहे.
“१९५८ पासूनचा प्रश्न आता निकाली काढा; शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे पट्टे तातडीने द्या,” अशी मागणी घेऊन हा संवाद होणार आहे. त्यामुळे मंजेगावातील हा शेतकरी संवाद कार्यक्रम शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

