
शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात तब्बल विविध शिक्षक संघटनांची संयुक्त बैठक; प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्वासन
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.३० सप्टेंबर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक व आर्थिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना एकवटल्या. बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या दालनात शिक्षणाधिकारी प्रेरक प्रकाश उजागरे यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षक संघटनांची संयुक्त बैठक पार पडली.

बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत सर्व संघटनांच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सेवाविषयक प्रकरणे, आर्थिक प्रश्न आणि इतर प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या प्रश्नांची दखल घेत शिक्षणाधिकारी प्रेरक प्रकाश उजागरे यांनी प्रलंबित समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सर्व शिक्षक संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्याबद्दल शिक्षणाधिकारी उजागरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या संयुक्त बैठकीमुळे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
धनंजय दुमपेटीवार यांचा भावपूर्ण सत्कार
यावेळी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली येथे सलग पाच वर्षे सहायक प्रशासन अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळणारे धनंजय दुमपेटीवार यांचे गडचिरोली पंचायत समितीत स्थानांतरण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तथा विविध शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक रॉयसिडाम, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश साखरे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे चक्रपाणी कन्नाके, डॉ. दिवाकर नारनवरे, महासंघाचे कार्याध्यक्ष दिलीप मेश्राम, कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष गौतम लांडगे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, शिक्षक परिषदेचे प्रमुख राज्य पदाधिकारी अविनाश तालापलीवार, विजय साळवे, जिल्हा प्रमुख कुणाल कोवे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे बापू मुनघाटे, गुरुदेव नवघडे, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश ढोरे, सरचिटणीस खिरेंद्र बांबोळे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध संघटनांनी एकत्र येत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकमुखी भूमिका मांडल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आता शिक्षण विभागाकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत आणि किती वेगाने होते, याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

