
लखमापूर बोरीच्या विशाळ मेश्रामची भरारी; ‘LSE’मध्ये सार्वजनिक धोरणाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड
प्रलय सहारे प्रतिनिधी
भेंडाळा : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेल्या एका आदिवासी तरुणाने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) या जगप्रसिद्ध शिक्षणसंस्थेपर्यंत मजल मारली आहे. चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील विशाल मेश्राम याची LSE मध्ये सार्वजनिक धोरण (Public Policy) विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.

विशालची ही यशोगाथा ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आदिवासी विकास विभागाकडून त्याला तब्बल ८०.२० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून LSE मध्ये शिक्षण घेणारा गडचिरोली जिल्ह्यातील पहिला आदिवासी विद्यार्थी म्हणून त्याची नोंद होत असल्याचे पोस्टरमध्ये नमूद आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले लंडन
विशाळचा शैक्षणिक प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला. घरची प्रतिकूल परिस्थिती, आईचे मानसिक आजाराने ग्रस्त असणे आणि वडिलांचे नुकतेच निधन अशा संकटांचा सामना करत त्याने शिक्षणाची वाट सोडली नाही. परिस्थितीसमोर न झुकता शिक्षणालाच आपली ताकद बनवत त्याने पुढील शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला.
प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर विशालने पुढील शिक्षणासाठीही मेहनत घेतली. त्याच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आणि जगातील नामांकित शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या London School of Economics (LSE) मध्ये प्रवेशाची संधी मिळाली.
गावाकडच्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण
विशाळ मेश्रामची ही कामगिरी केवळ एका विद्यार्थ्याचे वैयक्तिक यश नसून, ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करता येतात, हे विशाळने आपल्या प्रवासातून दाखवून दिले आहे.
लखमापूर बोरीच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास आता थेट लंडनपर्यंत पोहोचला आहे. विशाळच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

