
मतदार यादी पुनरीक्षणाचा विभागीय आयुक्तांकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा; जिल्ह्यात ७ लाख ३८ हजारांहून अधिक गणना अर्जांचे डिजिटायझेशन
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. २९ सप्टेंबर : “कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये. रोजगारासाठी तात्पुरते गावाबाहेर गेलेल्या नागरिकाचे नाव केवळ अनुपस्थितीमुळे मतदार यादीतून वगळू नये. अशा प्रकरणांची काळजीपूर्वक पडताळणी करून संबंधितांना बाजू मांडण्याची संधी द्यावी,” असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

मतदार यादी अचूक व सर्वसमावेशक करण्यासाठी पत्ता न लागलेल्या किंवा अनुपस्थित मतदारांची माहिती ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद व तहसील कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करावी. नागरिकांनीही मतदार यादीत आपले नाव तपासावे. पात्र असून नाव नसल्यास फॉर्म ६ द्वारे नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. नवमतदार, दिव्यांग, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांपैकी ७ लाख ३८ हजार २८८ गणना अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ९० हजार ६१६ अर्ज संकलित होऊ शकलेले नाहीत.
डिजिटायझेशन झालेल्या अर्जांपैकी २७ हजार ४१४ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, तर ५६ हजार ८५२ नोंदींमध्ये विसंगती आढळली आहे. अशा ८४ हजार २६६ प्रकरणांमध्ये सुनावणी अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ११० साहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत दररोज सरासरी २५ सुनावण्या घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
दुर्गम भागातील मतदारांना पडताळणीची माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. त्यावर तात्पुरत्या अनुपस्थितीची प्रकरणे काळजीपूर्वक तपासून नियमानुसार निर्णय घेण्याचे निर्देश बिदरी यांनी दिले.
मतदार यादीतील नोंदी अचूक करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

