
आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; आरोग्य-शिक्षण प्रश्नांसाठी हेल्पलाईनची घोषणा
पहिल्या टप्प्यात ३५ ‘प्रतिसरपंच’ नियुक्त; सतीश कुसराम कार्याध्यक्ष, तुषार रामटेके जिल्हा प्रवक्ते
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली, दि. २८ सप्टेंबर : भारत कृषिप्रधान देश असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अपेक्षित राजकीय प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करण्याचा ठराव आजाद समाज पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकर्ता संमेलनात मंजूर करण्यात आला. नोंदणीकृत शेतकरी आयडीधारकांना मतदानाचा अधिकार देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडणारा स्वतंत्र प्रतिनिधी निवडण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आजाद समाज पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटनात्मक विस्तार आणि ग्रामपातळीवरील जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर होते. महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव संदीपदादा मोरे आणि विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, ॲड. कैलास जाधव, देवाभाऊ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, चेतन काटेंगे, जिल्हा महासचिव अंकुश कोकोडे, जिल्हा संघटक हंसराज उराडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष विवेक खोब्रागडे होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची मागणी
शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च, बाजारभाव, सिंचन, पीकविमा आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या प्रश्नांना विधिमंडळात अधिक संघटितपणे मांडण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता असल्याचे यावेळी मांडण्यात आले.
पदवीधर मतदारसंघाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करून त्यांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार निवडण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. हा ठराव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
गावागावात ‘प्रतिसरपंच’; पहिल्या टप्प्यात ३५ नियुक्त्या
ग्रामपातळीवरील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामविकासातील अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाकडून ‘प्रतिसरपंच’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी प्रतिसरपंचांची नियुक्ती करण्यात आली.
यामध्ये वाकडी येथील विजय देवतळे, मार्कंडा येथील रत्ना सरपे, येडानूर येथील नितेश पोटावी, विहीरगाव येथील मुकेश सहारे, मालेवाडा येथील संतोष मोहुर्ले, बांधगाव येथील भास्कर वट्टी यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आरोग्य, शिक्षणाच्या प्रश्नांसाठी हेल्पलाईन
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य व शिक्षणाशी संबंधित अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या वतीने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हेल्पलाईन क्रमांक लवकरच जाहीर केला जाणार आहे.
शासकीय रुग्णालयांतील समस्या, उपचारातील अडचणी, आरोग्यसेवेतील त्रुटी, शाळा-शिक्षकांशी संबंधित प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शिक्षण विभागातील तक्रारी यासाठी या हेल्पलाईनचा उपयोग केला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संघटनात्मक विस्ताराला वेग; नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देताना विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.
सतीश कुसराम – जिल्हा कार्याध्यक्ष
तुषार रामटेके – जिल्हा प्रवक्ते
मारोती येलावार – चामोर्शी तालुकाध्यक्ष
सुरेश पवार – चामोर्शी तालुका उपाध्यक्ष
आकाश दुर्गे – चामोर्शी तालुका सचिव
पितांबर हर्रो – कुरखेडा तालुका उपाध्यक्ष
नितेश गृरुनुले – मालेवाडा क्षेत्र प्रमुख
रंजित बांबोळे – धानोरा तालुका कार्याध्यक्ष
उमेश तिम्मा – एटापल्ली तालुकाध्यक्ष
यासह विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी
आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका नियोजनबद्ध पद्धतीने लढण्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. प्रत्येक गावात पक्षाची उपस्थिती वाढविण्यावर भर देतानाच तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीत प्राधान्य देण्याचा मानस जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केला.
जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी पक्षाची आगामी कार्यपद्धती, संघटन विस्तार आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
शासकीय सेवेत निवड झालेल्या सहकाऱ्यांचा सत्कार
पक्षाचे सहकारी प्रितेश अंबादे, नयना बन्सोड आणि शुभम पाटील यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षा सोनाशी डांगे यांची आरोग्य विभागात शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल शिल्ड देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, गडचिरोली विधानसभा प्रमुख धनराज दामले, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, भामरागड तालुकाध्यक्ष महेंद्र उसेंडी, महिला आघाडीच्या तारका भडके, शोभा खोब्रागडे, वनिता उसेंडी, तसेच सतीश दुर्गमवार, नितेश वेस्कडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

