
पूरामुळे रस्ते बंद; लॉयड्सच्या हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णांना हेडरीत हलविले
गडचिरोली, दि. २८ सप्टेंबर : भामरागड तालुक्यासह सीमेलगतच्या छत्तीसगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. अशा गंभीर परिस्थितीत रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने रुग्णांना वेळेत उपचारासाठी हलविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, लॉयड्स मेटल्स ॶॅण्ड एनर्जी लिमिटेडच्या हेलिकॉप्टरने तीन गंभीर रुग्णांना तातडीने हेडरी येथे हलवून मोठी मदत केली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने या आपत्कालीन स्थलांतराचे नियोजन केले. बिनागुंडा परिसरातील नदी-नाल्यांना पूर आल्याने रस्ते वाहतुकीचे मार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते. शनिवारी (दि. २६) बिनागुंडा येथून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या संगीता चुक्कू उसेंडी (वय ७) या बालिकेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर रविवारी (दि. २७) तिला हेलिकॉप्टरच्या मदतीने लाहेरीहून हेडरी येथील काली अम्मल रुग्णालयात हलविण्यात आले.

यासोबतच अपेक्षा ऋषी आलाम आणि रोशन चिना मडावी या दोन रुग्णांनाही पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे नेण्यात आले. यापैकी एका रुग्णाला सिकलसेलचा त्रास असल्याची माहिती आहे.
रस्ते बंद; आकाशमार्ग ठरला आधार
पूरस्थितीमुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग बंद झाल्याने गंभीर रुग्णांना वेळेत पुढील उपचारासाठी हलविणे कठीण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन लॉयड्स मेटल्स ॶॅण्ड एनर्जी लिमिटेडने तातडीने हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. कंपनीचे बी. प्रभाकरन यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर निर्णय घेतला.
भामरागड परिसरात कंपनीच्या वतीने यापूर्वीच वैद्यकीय चमू मदतीसाठी पाठविण्यात आली होती. मात्र, तीन रुग्णांना तातडीने पुढील उपचारांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हेलिकॉप्टर सेवेत दाखल करण्यात आले. त्यामुळे पुराच्या पाण्यातून धोकादायक मार्गाने रुग्णांना नेण्याची जोखीम टळली आणि कमी वेळेत त्यांना रुग्णालयात पोहोचविणे शक्य झाले.
प्रशासनाचा समन्वय; रुग्णांना तातडीची मदत
रुग्णांच्या स्थलांतरासाठी आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत आणि भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी आवश्यक नियोजन व समन्वय साधला. रुग्णांसोबत निर्मला आलाम आणि चिना कुड्यामी हेही होते.
दरम्यान, भामरागड परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना खाद्यपदार्थ तसेच अन्य आवश्यक साहित्याचे वितरण करण्याचे कामही लॉयड्सच्या वतीने सुरू आहे. पूरामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असताना कंपनीने वैद्यकीय मदतीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिल्याने प्रशासनाच्या मदतकार्यास मोठा हातभार लागला आहे.
‘आकाशमार्ग’ ठरला जीवनमार्ग!
भामरागडच्या दुर्गम भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने जमिनीवरील मार्ग बंद झाले होते. अशा वेळी लॉयड्सच्या हेलिकॉप्टरने आकाशमार्गाने रुग्णालयाचा मार्ग खुला केला. या तातडीच्या मदतीमुळे तीन गंभीर रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
पूरस्थितीत प्रशासनासोबत समन्वय साधत वैद्यकीय मदतीसाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल बी. प्रभाकरन आणि लॉयड्स मेटल्स ॶॅण्ड एनर्जी लिमिटेडच्या मदतकार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

