
राजे अम्ब्रिशराव महाराज व कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांनी केक भरवून दिल्या शुभेच्छा.
राजमातांनी गाणे सादर करून जिंकली उपस्थितांची मने.
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी:- अहेरी इस्टेटच्या राजमाता, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा धर्मराव शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांचा वाढदिवस अहेरी राजमहालात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भला मोठा केक कापून राजमाता राणी रुक्मिणीदेवींनी वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसाच्या या खास प्रसंगी त्यांचे सुपुत्र अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज आणि कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांनी राजमातांना केक भरवून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या भावनिक आणि कौटुंबिक क्षणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.विशेष म्हणजे, वाढदिवस सोहळ्यात राजमाता राणी रुक्मिणीदेवींनी स्वतः गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या अनोख्या अंदाजाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. राजमातांच्या स्वरांनी राजमहालातील वातावरण आणखी आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले.
वाढदिवसानिमित्त राजमहालासमोर आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. फटाक्यांच्या रोषणाईने राजमहाल परिसर उजळून निघाला, तर आतिषबाजीचा नजारा पाहण्यासाठी उपस्थित नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. संपूर्ण अहेरी राजनगरीत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजमातांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अहेरी उपविभागातील राजघराण्याशी संबंधित मान्यवर, स्थानिक व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नावीस व भाजपचे पदाधिकारी, तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरातील विविध वॉर्डांमधील महिलांनीही पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत राजमातांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजमहालात शुभेच्छा देण्यासाठी नागरिक आणि चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. भला मोठा केक कापून वाढदिवस साजरा होत असताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत राजमाता राणी रुक्मिणीदेवींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या वाढदिवस सोहळ्यास अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज, कुमार अवधेशराव बाबा आत्राम, प्रवीणराव बाबा आणि वैभव श्यामकुंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी राजमहालात झालेल्या या भव्य आयोजनामुळे राजनगरीत उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. दिवसभर राजमहालात शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. केक कापण्याचा कौटुंबिक आनंदाचा क्षण, राजमातांचे गाणे आणि राजमहालासमोरील नेत्रदीपक आतिषबाजी यामुळे वाढदिवस सोहळ्याला विशेष रंगत आली.

