
पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; नागपूर चक येथे तिघांना चावा
चामोर्शी : तालुक्यातील नागपूर चक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांवर हल्ला करून त्यांना चावा घेतल्याची घटना काल दिनांक २७ सप्टेंबर रोजी रात्री गणेश विसर्जन कार्यक्रम सुरू असताना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या हल्ल्यात सचिन पाल (वय २३), किशोर पाल (वय २४) आणि शुभम पाल (वय २०), तिघेही रा. नागपूर चक हे जखमी झाले. कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने तिघांनाही चावा लागला.

जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार करून रेबीज प्रतिबंधक लस (Rabies Vaccine) दिली. उपचारानंतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, नागपूर चक परिसरात मोकाट व आक्रमक कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

