
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक समन्वय महत्त्वाचा — मुख्याध्यापक श्री. डी. आर. कुमरे
झिंगानूर (सिरोंचा) : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, झिंगानूर येथे विद्यार्थी-पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नियमित उपस्थिती, शिस्त, अभ्यासातील सातत्य आणि पालक-शिक्षक यांच्यातील समन्वय या महत्त्वपूर्ण विषयांवर मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांशी झालेल्या सकारात्मक संवादामुळे मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. आर. कुमरे होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. माराजी आत्राम, उपाध्यक्ष श्री. राकेश गावडे, तसेच समितीचे सन्माननीय पदाधिकारी, समाजसेवक व माजी ग्रा. पं. सदस्य. रामचंद्र कुमरी, मोहन कुडमेथे, सुरेश जनगाम, वंजा मडावी, सुरेश मडावी, मधुकर कुडमेथे, चिंतामण मडावी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधीक्षक-अधीक्षिका तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी पालक श्री. लक्ष्मण गावडे. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे व शिस्तीचे तीन महत्त्वाचे घटक आहेत. या तिन्ही घटकांमध्ये योग्य समन्वय असेल, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण अध्यापन करावे, विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे आणि पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे नियमित लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी वारंवार शाळेतून घरी जाणे टाळावे, यासाठी पालकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री. डी. आर. कुमरे यांनी विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले. निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार घरी घेऊन गेल्यामुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडतो आणि शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना केवळ अधिकृत सुट्टीच्या कालावधीतच घरी घेऊन जावे. अपरिहार्य कारणास्तव विद्यार्थी घरी गेल्यास त्यांना जास्त दिवस घरी न ठेवता लवकरात लवकर शाळेत परत आणावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व शिस्तीकडे लक्ष द्यावे, आवश्यक कागदपत्रे वेळेत शाळेत जमा करावीत आणि शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व सहकार्य असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. आर. वेळदा, प्राथमिक शिक्षक यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एस. पी. सिडाम, माध्यमिक शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, अधीक्षक-अधीक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
अशा प्रकारे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, झिंगानूर येथील विद्यार्थी-पालक झिंगानूर, वडदेली, येडसिली, लोहा, कल्लेड, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्ला, पुल्लीगुडम, कोपेला, मंगीगुडम, सिरकोंडा, रोमपल्ली, सोमनपल्ली, कर्जेली, या गावातील पालक पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे,

