
कडधान्य व पोस्टर रांगोळीला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सहभागींचा गौरव
नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
चामोर्शी, दि. २८ सप्टेंबर : सेवा सप्ताह २०२६ निमित्त भारतीय जनता पार्टी चामोर्शी मंडळाच्या वतीने रविवार, २७ सप्टेंबर रोजी सावतेली समाज भवन, बस स्टॉप, चामोर्शी येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत झालेल्या या स्पर्धेला महिला, युवती व रांगोळीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत कडधान्यापासून रांगोळी तसेच पोस्टर रांगोळी अशा दोन प्रकारांत स्पर्धकांनी आकर्षक, कल्पक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या साकारल्या. पारंपरिक कलेला आधुनिक आशयाची जोड देत स्पर्धकांनी आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन केले.
कडधान्यापासून रांगोळी स्पर्धेत तामदेव टोठे यांनी प्रथम, प्रिया सोनटके यांनी द्वितीय, तर आर्या चलाख यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पोस्टर रांगोळी स्पर्धेत सेजल बुरांडे यांनी प्रथम, अनु शेंडे यांनी द्वितीय, तर सौ. प्रगती गव्हारे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी ₹२,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१,५०० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹१,००० अशी रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कु. वैभवी गव्हारे, आरोही संतोषवार, त्रिशा चलाख, कृष्णप्रिया चलाख आणि श्वेता ठोटे यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारासागडे, तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे यांच्यासह आरती भिमनवार, कविता किरमे, माणिकराव कोहळे, नीरज रामानुजवार, नरेश आलसावार, सोपान नैताम, विनोद किरमे तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून कला, सर्जनशीलता आणि सामाजिक जनजागृतीचा सुंदर संगम साधला गेला. रांगोळी स्पर्धेमुळे चामोर्शी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सहभागींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

