
गडचिरोली जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करा; संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्या
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २८ सप्टेंबर :खरीप हंगामातील पावसाची अनियमितता, पावसातील तूट आणि त्याचा शेती पिकांवर झालेला परिणाम यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य शासनाने गडचिरोली व चामोर्शी या दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केला असला, तरी संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वितरण असमान राहिल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केवळ दोन तालुक्यांपुरता दुष्काळाचा निर्णय मर्यादित न ठेवता उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचाही तातडीने आढावा घेऊन आवश्यक मदत द्यावी, अशी भूमिका आ. मसराम यांनी मांडली आहे.
शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज
दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक नुकसानीचे पंचनामे आणि शासनाच्या आवश्यक सवलतींचा लाभ वेळेत मिळणे गरजेचे आहे. सध्या गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांत पीक परिस्थितीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी यापूर्वीही विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे.
“शेतकरी संकटात आहे; आता निर्णयाची गरज आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे,” या भूमिकेतून आमदार रामदास मसराम यांनी शासनाकडे जिल्ह्याचा व्यापक विचार करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचा सवाल आता थेट शासनाच्या निर्णयाकडे; संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला दुष्काळाच्या कक्षेत आणण्याची मागणी जोर धरत आहे.

