
घारगाव, रामाळा, फराडा, मोहर्ली येथे शांततामय रॅली; दर मंगळवारी आंदोलनाचा निर्धार
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी)दि.२९ सप्टेंबर : जमीन अधिग्रहणाच्या विरोधात महिला शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, शेतकरी महिलांनी एकजूट दाखवत प्रशासनाविरोधात शांततामय आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर घारगाव येथील महिलांनी आज दि.२९ सप्टेंबर रोजी, रामाळा, फराडा आणि मोहर्ली या चार गावांमध्ये शेतकरी महिला व नागरिकांनी एकत्र येत भव्य शांततामय रॅली काढली.

जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविका आणि भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत महिलांनी रॅलीच्या माध्यमातून आपला विरोध स्पष्ट केला. चारही गावांमधून निघालेल्या रॅलीला शेतकरी महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
घोषणांनी परिसर दणाणून सोडत आपल्या जमिनी व हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीचा संदेश देण्यात आला.
घारगाव, रामाळा आणि फराडा येथून निघालेल्या रॅलीचा समारोप मोहर्ली येथे करण्यात आला. यावेळी शेतकरी महिलांनी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत लोकशाही व शांततामय मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, यापुढे दर मंगळवारी शांततामय शेतकरी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी महिलांनी दिली. १४ गावांतील शेतकरी आणि महिलांची वाढती एकजूट पाहता जमीन अधिग्रहणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

