
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. १५ : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी विकासासोबत गडचिरोलीचा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत रोजगारक्षम गडचिरोली घडविण्याचा शासनाचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर, सहायक जिल्हाधिकारी अरुण एम., डॉ. अजय डोके तसेच अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील रस्त्यांसाठी सुमारे २६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून पूल, पाणी, आरोग्य, रेल्वे व विमानतळाच्या विकासाला गती देण्यात येत आहे. दुर्गम भागातील नागरिकांसाठी लवकरच ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगार मिळावा यासाठी खनिज संपदेवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
आश्रमशाळांतील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांसाठी सुविधा सुधारण्याचे नियोजन असून शेतकरी, महिला आणि युवकांसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
गडचिरोलीला दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आणण्याचे ध्येय असल्याचे सांगत, “जल, जमीन आणि जंगलाशी तडजोड न करता समृद्ध गडचिरोली घडवूया,” असे आवाहन ॲड. जयस्वाल यांनी केले.

