
विदर्भ विभागीय कार्यकारिणी जाहीर; चामोर्शी पत्रकार सेवा प्रतिष्ठानकडून अभिनंदनाचा वर्षाव
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी : व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ पत्रकार विनोद खोबे यांची विदर्भ विभागीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

पत्रकारांच्या विविध समस्या, हक्क व मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी नवनियुक्त कार्यकारिणीवर सोपविण्यात आली आहे. विदर्भातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी व योग्य व्यासपीठावर मांडण्यासाठी संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
विनोद खोबे यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार मित्र तसेच व्हॉइस ऑफ मीडिया परिवारातील पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चामोर्शी पत्रकार सेवा प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष नितेश गट्टीवार, सचिव अरुण गव्हारे,उपाध्यक्ष श्रावण वाकोडे व धनराज वासेकर, हस्ते भगत, कोषाध्यक्ष मारोती बारसागडे, पूंडलिक भांडेकर, प्रफुल कोटांगले तसेच व्हॉइस ऑफ मीडिया विदर्भ विभागीय कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. नियुक्तीनंतर विनोद खोबे यांनी संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पत्रकारांच्या हितासाठी सातत्याने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

