
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली /चामोर्शी : शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय अभिमानाच्या वातावरणात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. डी. एन. चापले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य डी. आर. चौधरी, उपप्राचार्य एस. एम. भर्रे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, शाळेचे हितचिंतक नितेश गट्टीवार, सुभाषजी करणे, श्रावणजी सोनटक्के, नंदाजी चलाख, वरवाडे जी, वनकर भाऊ, भास्करजी चौधरी, मोते मॅडम, पतंगे मॅडम, हेमलता रायपुरे, अनिल भांडेकर, कोटांगले जी, उराडे जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच शाळेतील सेवानिवृत्त कर्मचारी आर. के. बारसागडे सर, पी. जी. गोंगले, चिंतलवार सर, पी. जी. दुबे, इंगोले बाबूजी, वडेट्टीवार बाबूजी, किरमिरे बाबूजी, जी. वाय. कोल्हाटवार, आकुलवार सर, व्ही. जी. कोमेरवार, ए. व्ही. आक्केवार आणि एन. जे. कोठारे यांचीही उपस्थिती लाभली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत व पथसंचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक कराटे प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
याच कार्यक्रमात हैदराबाद येथे झालेल्या जे. एस. के. नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यशस इंद्रजीत रायपुरे याने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली. तर यश विनोद भुरसे याने काता व कुमिते प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्णपदक आणि एक रजतपदक मिळविले.
या यशामागे कराटे प्रशिक्षक धनराज चंदनखेडे तसेच तालुका क्रीडा प्रमुख राकेश खेवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा समितीचे अध्यक्ष डी. एन. चापले, प्राचार्य डी. आर. चौधरी आणि उपप्राचार्य एस. एम. भर्रे यांच्या हस्ते यशस रायपुरे व यश भुरसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य जपण्याचे, देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्याचे आणि जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा यशाचा गौरव अशा दुहेरी उत्साहात शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न झाला. कराटेपटूंच्या दमदार कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

