
आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनींना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली, एससी/एसटी विकास परिषद गडचिरोली, GDTA, नारीशक्ती, जंगोरायताड तसेच अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी मृत विद्यार्थिनींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मेणबत्त्या प्रज्वलित करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या दुर्दैवी घटनेबद्दल उपस्थितांनी तीव्र दुःख व्यक्त करताना आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शासनाने अधिक कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करणारे फलक झळकावले होते.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, एससी/एसटी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, GDTAचे डॉ. सचिन मडावी, आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जंगोरायताडच्या अध्यक्ष आरती कोल्हे, नारीशक्तीच्या अध्यक्ष जयश्री येरमे, जिल्हा महासचिव उमेश उईके, सचिव सुरज मडावी, ओमकार वेटे, आशिष कुमरे, प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, तालुका अध्यक्ष लिना कोकोडे, लक्ष्मी कन्नाके, अन्नपूर्णा सिडाम, अश्विनी आत्राम, डॉ. मिलिंद रामटेके, युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, बादल मडावी, डॉ. चेतन कोवे, डॉ. तारा वलके, डॉ. सुनील मडावी, डॉ. नितीन मसराम, डॉ. नीलकंठ मसराम, डॉ. प्रियंका मडावी, डॉ. सोनल कोवे, नलिनी कोवे, रविना उसेंडी, शारदा मडावी, शामला घोडाम, शशिकला जांगी, अश्विनी तुलावी, मायाबाई उसेंडी, फुलन उसेंडी, रेखा तोडासे, ऍड. कविता माहूरकर, ज्योती उंदीरवाडे, अर्चना टेकाम, रविता दुगा, अर्चना मडावी, शालू पोटावी, डॉ. संदीप किरंगे, डॉ. चंद्रशेखर शानगोंडा, डॉ. प्रदिप मडावी, डॉ. पुरुषोत्तम कुमरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आश्रमशाळांच्या अनियमिततेविरोधात फलक झळकावले
श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान आदिवासी विकास परिषद व विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय तसेच खाजगी अनुदानित आश्रमशाळांमधील अनियमितता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, आवश्यक सुविधा व प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत शासनाचे लक्ष वेधणारे फलक हातात घेतले.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, स्वच्छ व सुरक्षित परिसर, सर्पदंशासह आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी, नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करणारे फलक यावेळी दर्शविण्यात आले.
जपतलाई येथील घटना ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे शासनाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित आश्रमशाळांचे सुरक्षा व सुविधांचे तातडीने ऑडिट करावे, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली.
“विद्यार्थ्यांचा जीव अमूल्य आहे; आश्रमशाळांमध्ये सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा ही शासनाची जबाबदारी आहे,” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.

