
प्रतिनिधी|प्रलय सहारे
भेंडाळा,दि.३० जूलै : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) निकालात भेंडाळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद सेमी इंग्रजी केंद्र शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी:स्वराज मोरेश्वर साखरे,शिवांश कृष्णा सातपुते,शिवपाल राजेश्वर काडीवार,यावर्षी इयत्ता चौथीतील १६ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्यापैकी पहिल्याच प्रयत्नात तीन विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.

शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमित मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, कोणत्याही खाजगी शिकवणीचा आधार न घेता विद्यार्थ्यांनी केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हे घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशामागे मुख्याध्यापिका वंदना गुरनुले तसेच योग शिक्षक रविंद्र अशोक डोहणे यांनी घेतलेले परिश्रम आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि शाळेतील सर्व शिक्षकांना दिले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

