
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या हस्ते केला सत्कार
प्रलय सहारे|प्रतिनिधी
भेंडाळा : सूर्यांश साहित्यिक व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित कविता संग्रह प्रकाशन सोहळा व भव्य कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या साहित्यिक सोहळ्यात चामोर्शी तालुक्यातील कळमगाव येथील कवी प्रशांत चुधरी यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध नामवंत कवींनी आपल्या दर्जेदार व आशयपूर्ण कविता सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कविता, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संमेलनाला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरचे ज्येष्ठ कवी मा. डॉ. विद्याधर बन्सोड होते. प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील प्रसिद्ध लेखिका मा. सौ. मृणाल काशिकर, वणीचे ज्येष्ठ कवी मा. उत्तम गेडाम तसेच ब्रह्मपुरीचे ज्येष्ठ कवी मा. डॉ. धनराज खाणोरकर उपस्थित होते.
कवी प्रशांत चुधरी यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव झाल्याने कळमगावसह चामोर्शी तालुक्यातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करणाऱ्या चुधरी यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान त्यांच्या साहित्यिक प्रवासाला निश्चितच नवी ऊर्जा व प्रेरणा देणारा ठरला आहे.
सत्काराबद्दल कवी प्रशांत चुधरी यांनी सूर्यांश साहित्यिक व सांस्कृतिक मंच, आयोजक, मान्यवर तसेच उपस्थित रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
मिळालेला हा सन्मान पुढील साहित्यिक वाटचालीसाठी प्रेरणादायी असून भविष्यातही दर्जेदार साहित्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

