
आष्टी चौकात जमाव नियंत्रणाचा प्रात्यक्षिक सराव; ५ अधिकारी, १७ अंमलदार व ६१ होमगार्ड सहभागी
नितेश गट्टीवार|गडचिरोली
चामोर्शी : गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चामोर्शी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी, दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला.

चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रूटमार्चमध्ये पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर संचलन करून गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मिरवणूक मार्गावरील गर्दीची संभाव्य ठिकाणे, संवेदनशील भाग, वाहतूक व्यवस्था तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
आष्टी चौकात जमाव नियंत्रणाचा सराव
रूटमार्चनंतर आष्टी चौक येथे जमाव नियंत्रणाबाबत प्रात्यक्षिक सराव घेण्यात आला. मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाल्यास किंवा मिरवणुकीदरम्यान वाद अथवा अनुचित परिस्थिती उद्भवल्यास पोलिसांनी कोणत्या पद्धतीने आणि तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणावी, याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला.
या सरावामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिस दलाची तयारी अधिक मजबूत झाली आहे.
या रूटमार्च व जमाव नियंत्रण सरावात ५ पोलीस अधिकारी, १७ पोलीस अंमलदार आणि तब्बल ६१ होमगार्ड सहभागी झाले. मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणा रस्त्यावर उतरल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याचे चित्र दिसून आले.
शांतता व सलोखा राखण्याचे पोलिसांचे आवाहन
गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचा सण आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूटमार्च आणि जमाव नियंत्रणाच्या सरावामुळे चामोर्शी पोलीस दल उत्सव काळातील संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

