
महेंद्र दुर्वा यांच्या समोर अचानक वाघ; अख्खी रात्र झाडावर काढली, ग्रामस्थांच्या शोधानंतर गावाच्या दिशेने येताना आढळले
एटापल्ली (गडचिरोली): एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली, वासामुंडी, कोकोबंडा व जवेली जंगल परिसरात शनिवारी वाघाचा थरारक अनुभव एका २३ वर्षीय युवकाला आला. गाय-बैल राखण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या महेंद्र भाऊजी दुर्वा (वय २३) यांच्या समोर अचानक वाघ आल्याने त्यांची तारांबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी महेंद्र यांनी तातडीने झाडावर चढून आसरा घेतला. वाघाच्या भीतीमुळे त्यांनी अख्खी रात्र जंगल परिसरात झाडावरच काढल्याची माहिती आहे.
शनिवारी महेंद्र दुर्वा हे गाय-बैल राखण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. यावेळी अचानक त्यांच्या समोर वाघ आल्याने ते घाबरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जवळच्या झाडावर चढत स्वतःचा जीव वाचवला. वाघाच्या हालचालींचा धोका लक्षात घेता त्यांनी अक्खी रात्र झाडावरच थांबून राहिले.

रात्र झाली तरी महेंद्र घरी परतले नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरात शोधाशोध सुरू केली. ग्रामस्थ शोध घेत असतानाच महेंद्र गावाच्या दिशेने येताना दिसून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना सुरक्षितपणे गावात आणले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची तत्काळ हालचाल
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार यांनी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी श्री. अमर राऊत यांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत कळविले.
यानंतर वनविभागाचे कर्मचारी मरपल्ली गावात पोहोचले आणि त्यांनी सदर घटनेची माहिती जाणून घेतली. परिसरातील परिस्थितीची पाहणी करून वाघाच्या वावराबाबत आवश्यक माहिती घेण्यात आली.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच मरपल्लीसह वासामुंडी, कोकोबंडा व जवेली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने गुरे राखण्यासाठी तसेच शेतीच्या कामासाठी जंगलालगत जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी जंगल परिसरात वाघाचा वावर असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने परिसरात नियमित गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
आंदोलनाचा इशारा
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार व ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी वनविभागाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शनिवारच्या या घटनेमुळे मरपल्ली परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता वनविभाग वाघाच्या वावरावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त व प्रतिबंधात्मक कारवाई कधी वाढविणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

