
पाच महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले; सुशी दाबगावात हळहळ
प्रतिनिधी| मुल: सणासाठी बनवलेला वडा खात असताना अचानक आलेल्या शिंकेमुळे अन्नाचे कण श्वसनमार्गात अडकल्याची प्राथमिक माहिती असून, प्रकृती बिघडलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) सायंकाळी सुशी दाबगाव येथे घडली. या घटनेमुळे अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरचे आईचे मायेचे छत्र कायमचे हरपले असून, गावात शोककळा पसरली आहे.
हस्तकला चेतन गणवीर (वय ३०, रा. सुशी, ता. मूल) या शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या घरी बेडवर बसून वडा खात होत्या. त्याचवेळी अचानक त्यांना शिंक आली. शिंकेदरम्यान वड्याचे बारीक कण श्वसनमार्गात गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर त्या अचानक बेशुद्ध पडल्या.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी कोणताही विलंब न करता त्यांना पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना शुद्ध आली; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने गणवीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आईच्या कुशीतून पोरकं झालं चिमुकलं
अवघ्या पाच महिन्यांच्या बाळाला आईच्या निधनाची जाणीवही नाही. मात्र आईचे मायेचे छत्र अचानक हरपल्याने या चिमुकल्याच्या भविष्याचा विचार करताच उपस्थितांचे डोळे पाणावले. एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब दुःखाच्या सावटाखाली आले असून, या घटनेने संपूर्ण गाव हळहळले आहे.
हस्तकला गणवीर या ‘उमेद’ अभियानांतर्गत बचत गट प्रवर्तक म्हणून कार्यरत होत्या. सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी आपल्या कार्यातून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पती, अवघे पाच महिन्यांचे बाळ आणि कुटुंबीय असा परिवार आहे.
अन्न खाताना सावधानतेचा गंभीर संदेश
या दुर्दैवी घटनेने अन्न खाताना घाई न करणे, अन्न सावकाश चावून खाणे तसेच अन्नकण श्वसनमार्गात अडकल्यास तातडीने योग्य प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली आहे.
एका क्षणाच्या अनपेक्षित घटनेने एका कुटुंबाचा आधार हिरावला आणि पाच महिन्यांच्या बाळाच्या आयुष्यातून आईची माया कायमची हरपली. या घटनेने सुशी दाबगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

