
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली, दि. ३० जुलै :
भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीत लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण नदी आणि नाल्याच्या मधोमध अडकून जीवघेण्या संकटात सापडले होते. मात्र जिल्हा प्रशासनाची तातडीची दखल आणि एसडीआरएफच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता राबविलेल्या धाडसी बचाव मोहिमेमुळे तिन्ही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
बचाव करण्यात आलेल्यांमध्ये नवी केये कुडयामी (४०), अर्चना केये कुडयामी (१६) आणि अक्षरा केये कुडयामी (३), सर्व रा. लाहेरी, ता. भामरागड यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघे बुधवारी सकाळी शेतीच्या कामासाठी गावाबाहेर गेले होते. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आला. सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास नदी आणि नाल्याची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने तिघे नदी व नाल्याच्या मधील भागात अडकून पडले. काही क्षणांतच चारही बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने त्यांच्यासमोर जीविताचा मोठा धोका निर्माण झाला.
घटनेची माहिती सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांना दिली. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना माहिती दिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एसडीआरएफ पथकाला त्वरित घटनास्थळी रवाना करण्याचे आदेश देण्यात आले.
सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेदरम्यान मुसळधार पाऊस, अंधार आणि वेगवान प्रवाहाचा सामना करत एसडीआरएफच्या जवानांनी अत्यंत धाडसाने बचाव मोहीम राबविली. अथक प्रयत्नांनंतर तिन्ही जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे एकाच कुटुंबातील तिघांचे प्राण वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासन, तहसील प्रशासन आणि एसडीआरएफच्या जवानांच्या तत्परता, समन्वय आणि धाडसी कार्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून या बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

