
मुख्यमंत्रीच पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची दैन्यावस्था -काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था आणि मूलभूत सुविधांची विदारक स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील सालईटोला येथे एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिका किंवा अंत्ययात्रेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने बांबूला खाट बांधून खांद्यावरून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. मृत्यूनंतरही नागरिकांची सुटका होत नसल्याचे हे हृदयद्रावक चित्र असून, या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

सालईटोला परिसरात आरोग्य सुविधा, रस्ते आणि वाहतुकीच्या सोयींचा अभाव असल्याने आजारपणात रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, परिस्थिती इतकी गंभीर आहे की मृतदेह नेण्यासाठीदेखील ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. बांबू आणि खाटीच्या सहाय्याने मृतदेह खांद्यावर घेत ग्रामस्थांना दुर्गम मार्गातून प्रवास करावा लागल्याचे समोर आले आहे.
या घटनेवरून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “मुख्यमंत्रीच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तरीही जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी अशी वणवण करावी लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
“सरकार विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करते; मात्र प्रत्यक्षात गावकऱ्यांना मृतदेह खांद्यावर घेऊन चालावे लागत असेल, तर विकास नेमका कुणासाठी?” असा सवालही ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला.
दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांना तातडीने सक्षम आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, बारमाही रस्ते आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. सालईटोला येथील ही घटना केवळ एका कुटुंबाची व्यथा नसून संपूर्ण ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाचे विदारक वास्तव असल्याचेही त्यांनी म्हटले.
गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात आजही नागरिकांना जीवनाच्या शेवटच्या प्रवासासाठीही खडतर वाट तुडवावी लागत असेल, तर प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. “मृत्यूनंतरही सुटका नाही” अशी संतप्त भावना या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे

