
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली/चामोर्शी:
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात चामोर्शी शहरात आज दि.११ जून रोजी बंद पाळण्यात आला. विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पीडितेला न्याय मिळावा, आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
लक्ष्मी गेट ते पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन प्रकरणाचा जलद तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

“पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण असून न्यायासाठीचा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी वरिष्ठांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक(SP) एम. रमेश ,SDPO अनिकेत हिरडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
“या घृणास्पद कृत्याला कोणतीही माफी नाही. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी मजबूत आरोपपत्र सादर केले जाईल. शक्यतो त्याला जामीन मिळणार नाही यासाठीही कायदेशीर प्रयत्न केले जातील. तपास जलदगतीने पूर्ण करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न करू,” असे आश्वासन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले.
दरम्यान, संतप्त नागरिकांनी चामोर्शीच्या मुख्य महामार्गावर उतरून रस्ता रोको आंदोलन छेडले. अनेक तास वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठ, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून नागरिकांनी निषेध नोंदविला. परिणामी संपूर्ण शहरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक दीपक डोंब, वरिष्ठ अधिकारी हिरडे तसेच दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी तातडीने मोर्चा सांभाळला. आंदोलकांची समजूत काढत वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.

