
चामोर्शीतील मुख्य बसस्थानकाजवळ भीषण अपघात; २९ वर्षीय गितेशची प्रकृती गंभीर, चंद्रपूर येथे उपचार सुरू
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : अत्यंत अभ्यासू, होतकरू आणि मेहनती तरुण अशी ओळख असलेल्या गितेश अशोक वैरागडे (वय २९) याच्यावर सध्या चंद्रपूर येथे उपचार सुरू असून, त्याच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे. गितेशच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर मित्रपरिवार आणि नागरिकांकडून मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.

दि. ८ सप्टेंबर रोजी चामोर्शी शहरातील मुख्य बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडत असताना दुचाकीची धडक बसल्याने गितेश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथील यशोधन हेल्थकेअर येथे हलविण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट
या दुर्दैवी अपघातामुळे गितेशच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे उपचाराचा मोठा खर्च उभा राहिला असून, कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गितेशच्या उपचारासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता असल्याने मित्रपरिवाराने समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
“मदतीची रक्कम कितीही छोटी असली तरी या कठीण प्रसंगी गितेशच्या उपचारासाठी ती मोलाची ठरेल,” असे आवाहन मित्रपरिवाराने केले आहे.
आपली छोटीशी मदत ठरू शकते गितेशसाठी जीवनदायी!
गितेशच्या उपचारासाठी आपल्या परीने शक्य ती आर्थिक मदत करून या तरुणाच्या जीवनासाठी हातभार लावावा, अशी भावनिक विनंती करण्यात आली आहे.
मदतीसाठी संपर्क : 7387807039
टीप : मदत केल्यानंतर वरील क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

