
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांसमोर उच्च शिक्षणाच्या संधी अनेकदा मर्यादित राहतात. मात्र, जिद्द, गुणवत्ता आणि योग्य संधी मिळाल्यास याच भागातील युवक जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात, हे बांडे गावातील इग्नासियुस प्रकाश बडा यांनी सिद्ध केले आहे. सुरजागड लोहखनिज खाणी परिसरातील सामान्य कुटुंबातून आलेल्या इग्नासियस यांनी थेट ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षण पूर्ण करून मायभूमीत परतत नवा आदर्श निर्माण केला आहे.
लॉयड्स इनफिनिटी फाउंडेशनच्या कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून इग्नासियुस यांना ऑस्ट्रेलियात शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी कर्टिन विद्यापीठातून ‘मास्टर इन इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप’ हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. विशेष म्हणजे, परदेशातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तेथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मातीशी असलेले नाते कायम ठेवत गडचिरोलीत परतण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे.
इग्नासियुस यांचा प्रवास त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाचा ठरतो. बांडे गावात सात जणांच्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. आई सरिता या अंगणवाडी मदतनीस असून वडील प्रकाश बडा हे शेतकरी आहेत. मर्यादित आर्थिक परिस्थितीतून आलेल्या इग्नासियुस यांच्यासाठी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे सुरुवातीला दूरचे स्वप्न होते. मात्र, शिक्षणातील गुणवत्ता आणि क्षमता लक्षात घेऊन मिळालेल्या शिष्यवृत्तीने या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार दिला.

या प्रायोजकत्व कार्यक्रमांतर्गत शिक्षण शुल्कासोबतच निवास, प्रवास आणि दैनंदिन गरजा भागविण्याची जबाबदारी लॉयड्स इनफिनिटी फाउंडेशनने स्वीकारली. त्यामुळे आर्थिक अडथळ्यांवर मात करत इग्नासियुस यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक वातावरणाचा अनुभव घेता आला.
आपल्या प्रवासाबद्दल इग्नासियुस यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बांडे गावातून ऑस्ट्रेलियातील पर्थपर्यंत पोहोचण्याचा अनुभव आपल्यासाठी अत्यंत मोठा बदल घडवून आणणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले. या संधीमुळे आत्मविश्वास वाढला असून, मिळविलेले ज्ञान आता गडचिरोलीच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. प्रभाकरन यांनी २०२३ मध्ये स्थानिक युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग स्थानिक विकासासाठी करून घेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. इग्नासियुस बडा यांचे यश हे त्या उपक्रमाच्या दिशेने झालेली महत्त्वपूर्ण सुरुवात मानली जात आहे.
इग्नासियुस यांच्या यशाबद्दल बोलताना श्री.बी. प्रभाकरन यांनी हा केवळ एका विद्यार्थ्याचा विजय नसून संपूर्ण गडचिरोलीसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद केले. दुर्गम भागातील युवकांना जागतिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आपल्या परिसराच्या प्रगतीत सहभागी होण्यासाठी सक्षम करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परदेशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण, जागतिक अनुभव आणि त्यानंतर मायभूमीत परतून व्यावसायिक वाटचाल, अशी इग्नासियुस बडा यांची कहाणी गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी आशावादी संदेश देणारी ठरत आहे. योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास दुर्गम भागातील विद्यार्थीही आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेऊ शकतात, याचे ते जिवंत उदाहरण ठरले आहेत.

