
लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याची भाजपा तालुकाध्यक्ष रोशनीताई वरघंटे यांची मागणी
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी | दि. ८ सप्टेंबर :

चामोर्शी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आवास प्लसच्या यादीतून वंचित राहिलेल्या गरजू कुटुंबांचा तातडीने सर्वे करून त्यांचा आवास प्लसमध्ये समावेश करावा, तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती रोशनीताई वरघंटे यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी पंचायत समिती चामोर्शीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. अनेक गरजू कुटुंबे अद्यापही पक्क्या घरापासून वंचित असून, आवास प्लसच्या सर्वेक्षणातून काही पात्र लाभार्थी सुटल्यामुळे त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे अशा कुटुंबांचा प्रत्यक्ष सर्वे करून त्यांना योजनेत समाविष्ट करणे गरजेचे असल्याचे वरघंटे यांनी निवेदनातून स्पष्ट केले.
“एकही पात्र आणि गरजू कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये,” यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवून सुटलेल्या लाभार्थ्यांचा सर्वे करावा आणि पात्रतेनुसार त्यांना तातडीने आवास योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीसाठी भाजपा पदाधिकारी व नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे आवास प्लसमधून सुटलेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळणार का, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी भाजपा तालुका महामंत्री संजय खेडेकर, माजी शहर अध्यक्ष सोपान नैताम, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष रोहिदास धोटे, संतोष चुधरी, मोरेश्वर घेर, विनोद वासेकर, नामदेव सोमनकर, प्रभाकर वासेकर, अरुण वैरागडे, विलास घेर, वामन उडान, नामदेव टिकले, अर्चना उडान, दत्तू उडान, नरेश टिकले, रमेश वैरागडे, रामदास मरस्कोले, मारुती घेर, रवींद्र सोमनकर, रोशन भांडेकर, श्रीकांत वासेकर, पत्रुजी शेंडे, सरिता उडान, सिंधुबाई सोमनकर, छायाबाई टिकले, शरद वैरागडे, निंबाजी मिसार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

