
PMNRFच्या माध्यमातून २३ गरजू रुग्णांना आर्थिक आधार; कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांटसह गंभीर आजारांवरील उपचारांना मदत
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा पुढाकार मोठा आधार ठरत आहे. खासदार म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर १ जून २०२४ पासून आतापर्यंत प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधी (PMNRF) अंतर्गत जवळपास २३ गरजू रुग्णांना ५० लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे. या मदतीमुळे महागड्या उपचारांचा भार सहन करणाऱ्या अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि मोठ्या प्रमाणात दुर्गम भागांनी व्यापलेले आहे. अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित असून, कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांट तसेच इतर गंभीर आजारांचे उपचार अत्यंत खर्चिक असल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहते. अशा परिस्थितीत पैशाअभावी उपचार थांबू नयेत, यासाठी खासदार डॉ. किरसान यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
कागदपत्रांपासून निधी मंजुरीपर्यंत पाठपुरावा
रुग्णांच्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची मागणी प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल, आवश्यक कागदपत्रे, उपचाराचा अंदाजित खर्च आदी प्रक्रिया पूर्ण करून प्रकरणे प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीसाठी पाठविण्यात येतात. त्यानंतर आवश्यक ते मार्गदर्शन आणि पाठपुरावा करून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आतापर्यंत जवळपास २३ रुग्णांना उपचारासाठी ५० लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध झाले आहे. गंभीर आजाराच्या काळात मिळालेली ही मदत संबंधित रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आर्थिक आणि मानसिक आधार ठरली आहे.
आरोग्याच्या प्रश्नांनाही विकासाइतकेच प्राधान्य
खासदार डॉ. नामदेव किरसान हे केवळ विकासकामे, रस्ते, पायाभूत सुविधा किंवा मतदारसंघातील इतर प्रश्नांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांनाही प्राधान्य देत आहेत. गंभीर आजारांवरील उपचाराचा खर्च परवडत नसलेल्या कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.
“गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील कोणताही गरजू रुग्ण केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहू नये, हा आपला प्रयत्न आहे. गरजू रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील,” असे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले.
महागड्या उपचारांच्या काळात ५० लाखांहून अधिक रुपयांची मदत मिळवून देत २३ गरजू रुग्णांच्या कुटुंबांना दिलासा देण्याचा हा उपक्रम खासदार डॉ. किरसान यांच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.

