
नितेश गट्टीवार| गडचिरोली (आरमोरी) : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील परिस्थितीचा आढावा घेत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही सुशिक्षित मतदारांच्या हक्कांशी आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाशी निगडित असल्याने या निवडणुकीत पदवीधर मतदारांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आमदार रामदास मसराम यांनी यावेळी केले.
मतदान केंद्रांना भेटीदरम्यान त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीसंदर्भातील माहिती जाणून घेतली. तसेच मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यावर भर देत लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक पदवीधर मतदारांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग, जागरूक मतदान आणि लोकशाहीवरील विश्वास हे सक्षम लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत, असा संदेश या भेटीद्वारे देण्यात आला.

