
साखळी उपोषणाला डॉ.अजय कंकडालवार यांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा

अहेरी | अहेरी तालुक्यातील मध्यवर्ती कास्ट भांडार क्र.1 अंतर्गत कार्यरत असलेल्या हंगामी मजूर,चौकीदार,गटबांधणी तसेच वमोजामाप कामगारांचे गेल्या तब्बल पाच महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.वारंवार मागणी करूनही वेतन मिळत नसल्याने अखेर संतप्त कामगारांनी दि.22 ऑक्टोबर 2026 पासून साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
थकीत वेतन तात्काळ खात्यात जमा होईपर्यंत आम्ही एकही कामगार कामावर हजर होणार नाही,अशी आक्रमक आणि ठाम भूमिका कामगारांनी घेतली आहे.या आंदोलनामुळे भांडाराचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित कंत्राटदाराकडून जाणीवपूर्वक वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे.पाच महिने काम करूनही हातात एक रुपयाही न मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.सणासुदीच्या काळातही वेतन न मिळाल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
यासोबतच मध्यवर्ती कास्ट भांडार क्र.1 चे प्रशासन आणि संबंधित विभाग या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अजय कंकडालवार यांनी दिली उपोषण मंडपाला भेट
या साखळी उपोषणाची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जनतेच्या हक्कासाठी नेहमी लढणारे नेतृत्व डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ उपोषण मंडपाला भेट देऊन आंदोलक कामगारांशी संवाद साधला व त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला.
यावेळी कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर कंकडालवार यांनी संताप व्यक्त केला.ते म्हणाले,ऊन-पावसात राबणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या घामाचा पैसा पाच-पाच महिने थांबवून ठेवणे हा अत्यंत अमानवीय आणि संतापजनक प्रकार आहे.कंत्राटदाराची ही दादागिरी आणि मनमानी खपवून घेतली जाणार नाही.प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कंत्राटदारावर कडक कारवाई करावी आणि कामगारांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे.
कामगारांच्या मेहनतीचा मोबदला वेळेत मिळालाच पाहिजे,हा त्यांचा संवैधानिक अधिकार आहे.या लढ्यात काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी कामगारांच्या पाठीशी उभा आहे,असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
1.गेल्या पाच महिन्यांचे संपूर्ण थकीत वेतन तात्काळ रोख स्वरूपात अदा करण्यात यावे.2.कंत्राटदाराकडून होणारी मनमानी, दडपशाही आणि आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबवावी.3.मध्यवर्ती कास्ट भांडार क्र.1 च्या वरिष्ठ प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून वेतन वसुलीसाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत.4.भविष्यात वेतन वेळेवर मिळेल याची लेखी हमी द्यावी.
थकीत वेतन मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही,आमचे हे साखळी उपोषण असेच सुरू राहील आणि गरज पडल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू,असा इशारा आंदोलक कामगारांनी यावेळी दिला आहे.

