
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने नियुक्ती; जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवी दिशा देण्याची जबाबदारी

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, पंकज गुड्डेवार यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत नियुक्तिपत्र जारी करण्यात आले. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकीय आणि संघटनात्मक वर्तुळात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी पंकज गुड्डेवार यांना नियुक्तिपत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रदेश नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासामुळे गुड्डेवार यांच्यावर आता जिल्ह्यातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संघटनेची बांधणी, कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आव्हान!
गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि विविध सामाजिक-राजकीय परिस्थिती असलेल्या जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविणे हे नव्या प्रभारी अध्यक्षांसमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविणे आणि संघटनेची व्याप्ती वाढविणे, या बाबींवर त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून संघटनात्मक कामाला गती देणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे आणि जनसामान्यांशी पक्षाचा संपर्क अधिक दृढ करणे, या माध्यमातून काँग्रेसला जिल्ह्यात नवी ऊर्जा देण्याची संधी गुंडेवार यांच्यासमोर आहे.
प्रदेश नेतृत्वाच्या विश्वासाला कितपत उतरतात खरे?
गडचिरोली जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रदेश नेतृत्वाने पंकज गुंडेवार यांच्यावर विश्वास दाखवित महत्त्वाची जबाबदारी सोपविली असताना, ते जिल्ह्यातील पक्ष संघटनेला कोणती दिशा देतात, कार्यकर्त्यांची मोट कशी बांधतात आणि काँग्रेसची राजकीय ताकद वाढविण्यासाठी कोणती रणनीती आखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नव्या जबाबदारीतून काँग्रेस संघटनेला बळकटी, कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि जिल्ह्यात पक्षाच्या विस्ताराला गती मिळणार का? याचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे. दरम्यान, पंकज गुड्डेवार यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

