
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम मानल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यात जलसंकट दूर करून आदिवासी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन आणि ‘हिंदुस्थान युनिलिव्हर फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यामाने ३० गावांमध्ये ‘जलसुरक्षा आणि शाश्वत उपजीविका कार्यक्रम’ प्रभावीपणे राबविला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळण्यासोबतच स्थानिक कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
जलसंधारण आणि सिंचन विस्तार
सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी आखलेल्या या योजनेची अंमलबजावणी ‘वॉटर shed ऑर्गनायझेशन ट्रस्ट’ करत आहे. प्रकल्पांतर्गत सुमारे १६० कोटी लिटर (१.६ अब्ज लिटर) अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ३ हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन सिंचनाखाली येणार असून, सुमारे 3100 मी कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे. पारंपारिक जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, पाणलोट क्षेत्रांचा विकास आणि पाण्याचा सुयोग्य वापर यावर विशेष भर दिला जात आहे.

१,०९८ कामांचा टप्पा पूर्ण; आधुनिक शेतीवर भर
कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत १,४४९ लाभार्थ्यांपर्यंत पोहचून १,०९८ विविध विकासकामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. शेतीतील उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना ‘एसआरआय’ (SRI) पद्धतीने भातलागवड, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती आणि हवामानपूरक शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे.

उत्पन्नाचे बहुविध पर्याय आणि महिला सक्षमीकरण
केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता, आंबा व फणस लागवड, मत्स्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन आणि हस्तकलेसारख्या सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये स्थानिक महिलांचा पुढाकार वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यावर भर दिला आहे.
कृषी क्षेत्रात ४,२०० टनांची वाढ अपेक्षित
प्रकल्पाच्या अखेरपर्यंत कृषी व पूरक क्षेत्रात ४,२०० टनांपेक्षा जास्त अतिरिक्त उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे सहभागी कुटुंबांना एकत्रितपणे सुमारे १५ कोटी १२ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जलसंधारण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ही सांगड एटापल्लीच्या विकासात एक नवा अध्याय लिहीत आहे.

