
मूलमध्ये राजकीय आकसातून प्रशासनाचा गैरवापर? ‘दरार दुर्गा मंडळा’वरील कारवाईविरोधात गांधी चौकात २४ तारखेला सकाळी ९. ०० वा साखळी व बेमुदत आमरण उपोषण करणार!
— बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांचा आरोप; पाच मंडळांच्या मिरवणुकीत एकाच मंडळावर कारवाई का?

मूल |जिल्हा प्रतिनिधी..
“मूल शहरात २१ ऑक्टोबर रोजी पाच शारदा व दुर्गा मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. सर्वत्र डीजेचा आवाज सुरू असताना पोलिसांनी केवळ ‘दरार दुर्गा मंडळा’वरच कारवाई का केली? इतर चार मंडळांच्या डीजेच्या आवाजाची तपासणी करण्यात आली होती का? कारवाईत हा दुजाभाव कशासाठी? या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. राजकीय आकसातून प्रशासनाचा वापर करून आम्हाला लक्ष्य केले जात असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा घणाघाती आरोप मूल नगरपरिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी केला आहे.

२१ ऑक्टोबर रोजी मूल शहरातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी ‘दरार दुर्गा मंडळा’शी संबंधित डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणांवर कारवाई करत तब्बल ८२ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे समोर आले आहे. मात्र, शहरात एकूण पाच मंडळांच्या मिरवणुका निघाल्या असताना कारवाई केवळ एकाच मंडळावर झाल्याने पोलिसांच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे समर्थ यांनी म्हटले आहे.
पाच मंडळांच्या मिरवणुका, मग एकाच मंडळावर कारवाई का?
याबाबत बोलताना प्रशांत समर्थ म्हणाले, “आमचा प्रश्न अगदी सरळ आहे. शहरात पाच मंडळांच्या मिरवणुका निघाल्या होत्या. जर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. पोलिसांनी सर्व मंडळांच्या डीजेच्या आवाजाची समान निकषांवर तपासणी केली का? इतर मंडळांवरही अशीच कारवाई करण्यात आली का? याची स्पष्ट माहिती जनतेसमोर आली पाहिजे. एका मंडळावरच एवढी मोठी कारवाई झाल्याने नागरिकांच्या मनात संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे.”
पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, लक्की डीजेचा आवाज १०२.१ डेसिबल, स्वालीबो डीजेचा १०५.३ डेसिबल, काली धुमालचा ११२.९ डेसिबल आणि वंकी डीजेचा ११२.० डेसिबल नोंदविण्यात आल्याचा उल्लेख आहे. या कारवाईत ८२ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, इतर मंडळांच्या मिरवणुकांमध्ये ध्वनिपातळीची मोजणी कशी करण्यात आली आणि त्याबाबत कोणती कारवाई झाली, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे समर्थ यांनी सांगितले.
राजकीय दबावाची चौकशी करा!
“प्रशासनाने कायद्याप्रमाणे काम करावे, याला आमचा विरोध नाही. ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडले असतील, तर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. पण कायदा सर्वांना समान असताना एखाद्यालाच लक्ष्य केले जात असल्याची भावना निर्माण होत असेल, तर त्यामागचे कारणही जनतेला कळले पाहिजे. ही कारवाई कोणत्याही राजकीय दबावाशिवाय झाली आहे का, याचीही चौकशी व्हावी,” अशी मागणी प्रशांत समर्थ यांनी केली.
या प्रकरणात कोणाचा राजकीय हस्तक्षेप होता का, कारवाईसाठी सर्व मंडळांना समान निकष लावण्यात आले होते का आणि जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया काय होती, या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, असेही त्यांनी नमूद केले.
अन्यायाविरोधात गांधी चौकात बेमुदत उपोषण
“आम्ही या प्रकरणात कोणत्याही प्रकारची दडपशाही सहन करणार नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे—नियम सर्वांसाठी समान असावेत आणि कारवाई पारदर्शक असावी. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले नाही, तर या कथित अन्यायाविरोधात मी आणि नगराध्यक्षा एकता समर्थ गांधी चौकात बेमुदत उपोषणाला बसणार आहोत,” असा इशारा प्रशांत समर्थ यांनी दिला.
“आम्हाला कोणाशीही वैयक्तिक संघर्ष करायचा नाही. मात्र, जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळालीच पाहिजेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे काम करावे. या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत आम्ही आमची भूमिका ठामपणे मांडत राहू,” असेही समर्थ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची अधिकृत बाजू, इतर मंडळांच्या मिरवणुकांदरम्यान केलेल्या ध्वनिमापनाची माहिती आणि संबंधित कारवाईबाबतचे स्पष्टीकरण समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रशांत समर्थ यांच्या आरोपांवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे मूल शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
News jagar Chandrapur District….

