
दारूच्या नशेत तरुणाची धक्काबुक्की; काही वेळातच बेशुद्ध होऊन मृत्यू, चामोर्शी पोलिसांकडून तपास सुरू

जिल्हा प्रतिनिधी| गडचिरोली
चामोर्शी : तालुक्यातील गणपुर येथे किरकोळ वादातून घडलेल्या घटनेनंतर एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली. चंद्रशेखर बाजीराव पाल (वय २७, रा. गणपुर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चामोर्शी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, गणपुर येथील उल्हास तिमोडे यांच्या दुकानासमोर चंद्रशेखर पाल आणि प्रतीक शंकर आलाम (वय २१, रा. गणपुर) यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी चंद्रशेखर पाल हा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. वादादरम्यान चंद्रशेखर याने प्रतीक आलाम याची कॉलर पकडून त्याच्याशी धक्काबुक्की केली.
दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या शुभम बंडू डोके यांनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद सोडविला. त्यानंतर शुभम डोके यांना फोन आल्याने ते काही अंतरावर जाऊन उभे राहिले. याचवेळी चंद्रशेखर पाल हा पुन्हा प्रतीक आलाम याच्याकडे मारण्यासाठी जात असताना अचानक कशाचा तरी धक्का लागून खाली पडला. खाली पडल्यानंतर तो बेशुद्ध झाला.
रुग्णालयात नेले; डॉक्टरांनी केले मृत घोषित
चंद्रशेखर बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच शुभम डोके व इतरांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो शुद्धीवर न आल्याने त्याच्या नातेवाइकांनी त्याला येणापूर येथील रुग्णालयात नेले. तेथे त्याला दाखल करून घेण्यात न आल्याने नातेवाइकांनी चंद्रशेखर याला ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
शरीरावर जखमा आढळल्या नाहीत; पोलिसांकडून तपास
घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहणी केली. यावेळी मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नसल्याची माहिती आहे.
त्यानंतर पोलिसांनी गणपुर येथील घटनास्थळी भेट देऊन परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. प्राथमिक चौकशीत चंद्रशेखर पाल हा प्रतीक आलाम याने ढकलल्यामुळे पडला, असे सांगणारा कोणीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी घटनास्थळाचा पंचनामा व इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. नातेवाइकांची तक्रार दाखल करून अकस्मात मृत्यूची (मर्ग) नोंद करण्यात आली आहे.
चंद्रशेखर पाल याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तो खाली कसा पडला आणि या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याबाबतचा उलगडा शवविच्छेदन अहवाल व पुढील तपासानंतरच होणार आहे. चामोर्शी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

