
पोलीस हुतात्मा दिनानिमित्त गडचिरोलीत शहीद कुटुंबीयांचा सन्मान; पोलीस अधिकाऱ्यांनी घरी जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२२ ऑक्टोबर : देशाची सुरक्षा आणि जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस वीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त शहीद कुटुंबीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्यात आला.

शहीद जवानांचे बलिदान विसरता येणार नाही!
कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि देशसेवेचा सर्वोच्च आदर्श समोर ठेवत कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या पोलीस जवानांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून गडचिरोली येथील एकलव्य सभागृह आणि अहेरी उपमुख्यालय येथे शहीद कुटुंबीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले. शहीद जवानांनी देशाच्या सुरक्षेसाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहन केलेला विरह यांची जाणीव ठेवत पोलीस दलाने या माध्यमातून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.
शहीद कुटुंबीयांच्या घरी पोहोचले पोलीस अधिकारी!
केवळ सभागृहातील सन्मान सोहळ्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. पोलीस दल आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हा विश्वास देण्याचा प्रयत्न या भेटीतून करण्यात आला.
शहीद जवानांचे बलिदान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग कायम स्मरणात ठेवणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांना आधार देणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
शहीदांचे बलिदान प्रेरणादायी; कुटुंबीयांचा सन्मान हीच खरी कृतज्ञता!
पोलीस हुतात्मा दिन हा केवळ शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा दिवस नसून, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या कुटुंबीयांप्रती आपली जबाबदारी अधोरेखित करणारा दिवस आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमातून शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देतानाच त्यांच्या कुटुंबीयांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

